Last Updated on January 30, 2023 by Piyush
Cotton Farmer : सरत्या कालावधीत कापसाच्या खेडा खरेदीला देखील वेग आला आहे. काही शेतकऱ्यांना रोख पैशाचे, तर काहींना जागेवर खरेदीचे आमिष दाखवत कमी पैशात कापसाची खरेदी केली जाते. ग्रामीण भागात खेडा खरेदीत शेतकऱ्यांकडून बाजारापेक्षा ८०० ते १००० रुपये कमी दराने व्यापाऱ्यांकडून – खरेदी सुरू असल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये कापूस विकावा की ठेवावा असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच कमी दरात खरेदी सुरू असल्याने एकप्रकारे शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचे चित्र आहे.
यंदा सुरुवातीपासूनच कापसाचा बाजार थंड सुरू असून, दरात चढ-उतार होत आहे. त्यात ‘सेबी’ने सन २०२१ मध्ये काही शेतमालांच्या फ्यूचर मार्केटमधील वायद्यांवर वर्षभराची बंदी घातली होती. त्याला आता एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याने ही बंदी डिसेंबर २०२३ पर्यंत कायम असणार आहे. जानेवारी २०२३ पासून तर ‘सेबी’ने कापसाचे वायदे बंद केले आहेत. परिणामी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कापसाचे दर घसरले आहेत.
कापसाची पंढरी असलेल्या अकोटच्या बाजारात कापूस ८ हजार ते ८ हजार ६०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होत आहे. कापसाचा बाजार थंडावल्याने ग्रामीण भागात खेडा खरेदीला वेग आला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांकडून ७ हजार ते ८ हजार प्रतिक्विंटल दरानेच कापूस खरेदी केला जात असल्याचे वास्तव आहे.
अनोळखी व्यापाऱ्यांची गावागावांत भेट
ग्रामीण भागात कापसाची खरेदी करण्यासाठी अनोळखी व्यापारी जात असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. परिणामी शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे.
लाखो क्विंटल शेतकऱ्यांच्या घरातच
यंदा कापसाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. अतिवृष्टीमुळे उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली असून, मजुरीही महागली आहे. त्यात बाजारात दर नसल्याने खर्चही वसूल होणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवण्यास पसंती दिली आहे. जिल्ह्यात लाखो क्विटल कापूस घरातच पडून असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येते.
वाचा : कांद्याचा दर 300 रुपयांनी पडला; सोलापुरात विक्रमी 1200 ट्रक आवक