पुणे : ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली असली तरी शहरात थंडी कायम आहे. रविवारी (दि. २६) किमान तापमान १२.९ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. दरम्यान, पुढील तीन दिवसांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.
उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्यामुळे शहरात थंडी कायम आहे. सध्या निरभ्र आकाश तसेच अंशतः ढगाळ हवामान आहे. त्यामुळे किमान तापमानात चढ उतार होत आहे. रविवारी शहरातील किमान तापमान १२.९ अंश सेल्सिअस होते. तर पाषाणमध्ये १४.२ तर लोहगावमध्ये १४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
रविवारी कमाल तापमान ३१.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. शहरात २६ डिसेंबर ते १ जानेवारीदरम्यान आकाश निरभ्र राहणार आहे. २८ डिसेंबरला अंशतः ढगाळही राहणार आहे. त्यामुळे कमाल तापमानातही १६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होणार असून थंडीचा कडाका कमी होणार आहे. तर पुन्हा किमान तापमान १३ अंश सेल्सिअसवर जाणार असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.
मराठवाडा, विदर्भात गारा पडण्याची शक्यता
मराठवाडा व विदर्भात २८ व २९ डिसेंबर रोजी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण व उर्वरित मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान सोलापूरमध्ये ३३.२ तर सर्वात कमी तापमान जळगावमध्ये ११.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे.
‘शक्ती कायदा’ विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर, जाणून घ्या काय आहे शक्ती कायदा?