Last updated on January 10th, 2022 at 12:43 pm
धुळे तालुक्यातील निकुंभे येथे १५ -दिवसांपूर्वी छिन्न-विछन्न अवस्थेतील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. त्याची ओळख पटविल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. यात आतेभावानेच मामेभावाचा घात केल्याचा प्रकार समोर आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दिली आहे. उसनवार पैशांच्या वादातून गोरक्षनाथ पाटील यांची हत्या झाल्याचे निष्पन्न पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
उसनवार पैशांच्या वादातून गोरक्षनाथ पाटलांची हत्या झाल्याचे निष्पन्न
सोनगीर पोलीस ठाणे हद्दीतील निकुंभे ता. धुळे शिवारात जंगलात दि. १६ डिसेंबर २०२१ रोजी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत मिळून आला होता. याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गोपनिय शाखेचे कर्मचारी पोकों विजय जब्बरसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरुन भादंवि कलम ३०२, २०१ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व सोनगीर पोलीस ठाण्याकडून संयुक्त प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन तसेच नागरीकांशी प्रत्यक्ष संपर्क करून परिसरात मृत व्यक्तीचा फोटो व्हायरल करण्यात आला. त्यातून दि. २० डिसेंबर रोजी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मृताची ओळख पटविण्यात आली.
एलसीबीकडून निकुंभे येथील खुनाचा गुन्हा उघडकीस
मृत व्यक्ती गोरक्षनाथ विठ्ठल पाटील (४०) मूळ रा.नगाव ता. धुळे, हल्ली रा.प्लॉट नं. ३१, साई कॉलनी, अरुणनगर वडेलरोड देवपूर धुळे येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेमार्फत या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असतांनामृत गोरक्षनाथ पाटील याच्या कौटुंबिक व आर्थिक पाश्र्वभुमीचा कौशल्यपुर्वक अभ्यास करण्यात आला. त्यात गोरक्षनाथ पाटील याचा आतेभाऊ गजानन सजन देवरे पाटील (४२) रा. ज्योतोबा मंदिराजवळ, भोकर ता. धुळे याचे वर्तन तसेच विविध साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीअंती गजानन देवरे याच्याकडे संशय बळावला. परंतु गजानन देवरे हा एल.एल.बी.च्या तिसऱ्या वर्षांचे शिक्षण घेत असल्याने त्याचा कायद्याचा अभ्यास असल्याने पळवाटांचा पुरेपुर वापर करीत होता. परंतु गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी चौकशी अंती कौशल्यपुर्वक संशयिताचे वर्तन व देत असलेल्या उत्तरांचे विशेषण करून कसून चौकशी केली असता संशवीत गजानन देवरे याने गुन्ह्याची कबुली दिली.
तिक्ष्ण हत्यार व दगडांचा वापर
मृत गोरक्षनाथ पाटील व संशयीत गजानन देवरे हे एकमेकांचे सख्खं आतंभाऊ – मागंभाऊ असुन त्यांच्यात नेहमी आर्थिक व्यवहार होत होते. दूध वाटपाचा व्यवसाय करणाऱ्या गजानन देवरे याची गोरक्षनाथ पाटील यांच्याकडे दुधाची व वेळोवेळी दिलेले उसनवार पैशांची उधारी वाढत गेली. ही उधारी जवळपास ४ लाख रुपयांपर्यंत गेल्याने संशयीत गजानन दंवरे हा गोरक्षनाथ पाटील याच्याकडे वेळोवेळी उसनवार पैशांची मागणी करीत होता. दि. १५ डिसेंबर रोजी दोघे चिचगाव डंढाणे (ता. धुळे) गावाकडे मोटारसायकलनं जात असतांना त्यांच्यात उसनवार पैशांच्या व्यवहारावरुन वाद झाला. या वादातून गजानन देवरे यानं तिक्ष्ण हत्यार व दठाडाचा वापर करून गोरक्षनाथ पाटील याचा खून केला. त्याची ओळख पटणार नाही, अशा अवस्थेत मृतदेह त्याने सोडुन दिला होता. शिवाय, गोरक्षनाथ पाटील याच्या अंत्यविधीच्या सर्व कार्यक्रमात हजर राहून कोणाराही संशय येणार नाही, असे तो वावरत होता. परंतु गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उपअधीक्षक प्रदीप मेराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पोउनि बाळासाहेब सुर्यवंशी, योगेश राऊत, हेको संजय पाटील, संतोष हिर, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील, योगेश चव्हाण, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, योगेश जगताप, किशोर पाटील, सुनिल पाटील, मनोज महाजन, हकॉ विलास पाटील, पोना गुलाब पाटील यांनी केली आहे.
पत्नीच्या भीतीने बाथरुममध्ये लपवून ठेवले दारू, गडबडीत पिले गेले ऍसिड