Last updated on January 10th, 2022 at 02:46 pm
नागपूर : क्रोध हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू. क्रोध हा विकार आहे. तो उफाळून आला की, माणसाचा आपल्या मनावर ताबा राहात नाही. माणूस स्वतःची विवेकशक्ती गमावून बसतो. क्रोधामुळे माणसाला स्थळ, काळ, औचित्य आणि नात्याचही भान राहात नाही.
या क्रोधातून अनेक गंभीर घटना घडल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे. त्याचीच प्रचिती सोमवार, १५ नोव्हेंबर २०२१ रोजी परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महावीर चौकात आली. केवळ उधारीच्या पैशाच्या कारणावरून उद्भवलेल्या वादात मित्रानेच पानटपरीचालक मित्राची चाकूने हल्ला चढवून हत्या केली.
एका जीवलग मित्राला संपवून टाकावा इतका राग त्याला कसा आला, हा परतवाडावासीयांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. परतवाडा शहरातील पेन्शनपुरा येथील रहिवासी निखिल विजय मंडले (२५) हा पानटपरी चालवून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होता. शहरातील महावीर चौकात त्याची पानटपरी होती.
निखिलचा जीवलग मित्र विक्रम ऊर्फ विक्की सदानंद धाडसे (२५) रा. पेन्शनपुरा हा सुद्धा त्याच्या पानटपरीवर नेहमी येत होता. मित्र असल्याने विक्रमची निखिलच्या पानटपरीवर उधारी होती. परंतु, विक्रम हा नियमित पैसे देत नसल्याने त्याच्यावर बरीच उधारी शिल्लक होती. त्यामुळे निखिल हा विक्रमला वारंवार उधारीचे पैसे मागत होता. मात्र त्यानंतरही विक्रमने उधारीचे पैसे दिले नाही.
दरम्यान, अमरावती शहरात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरातही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे घटनेच्या दिवशी सोमवार, १५ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास निखिल महावीर चौकातील आपली पानटपरी बंद करण्याच्या लगबगीत होता.
त्याचवेळी विक्रम हा नीलेश गंगाधर बारखडे (३१) रा. देशमुख प्लॉट याच्यासोबत दुचाकीने तिथे आला. तो पानटपरी बंद करण्याच्या तयारीत असलेल्या निखिलजवळ गेला. यावेळी निखिलने विक्रमकडे पुन्हा पानटपरीवरील उधारीच्या पैशांची मागणी केली. या कारणावरून त्यांच्यात वाद उद्भवला. वाद विकोपाला गेल्यावर विक्रमने आपला मित्र निखिलवरच चाकूने हल्ला चढविला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेला निखिल रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्यानंतर विक्रमने तिथून पळ काढला.
ओरडण्याचा आवाज ऐकून ही बाब संचारबंदी बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने विक्रमचा पाठलाग केला. यावेळी एका घरात शिरलेल्या विक्रमला पोलिसांनी पकडले. पोलिसांनी त्याच्याजवळून चाकू जप्त केला. सदर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. सर्वत्र गोंधळ उडाला. आवाज ऐकून निखिलचा आतेभाऊ निलू रघुवीर नंदवंशी (३०) रा. पेन्शनपुरा हा तिथे आला.
यावेळी त्याला विक्रमला पोलिसांनी पकडून ठेवल्याचे दिसून आले. तर मामेभाऊ निखिल हा पानटपरीच्या ओट्यावर रक्ताच्या आरोपी थारोळ्यात पडलेला असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे निलूने आपल्या काही मित्रांच्या मदतीने निखिलला तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती निखिलला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले, साहाय्यक पोलीस निरीक्षक सुलभा राऊत, साहाय्यक पोलीस निरीक्षक राजू साळवे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष रामेकर, श्रीकांत वाघ यांनी घटनास्थळ गाठले.
घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरात चौकशी करण्यात आली. प्रकरणात पोलिसांनी निलू नंदवंशी याच्या तक्रारीवरून आरोपी विक्रम धाडसे व नीलेश बारखडे या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.
सध्या दोन्ही आरोपी कारागृहात आहेत. उधारीचे पैसे मागितल्याने आलेल्या रागातून मित्रानेच मित्राचा खून केल्याच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत व्यावसायिक असलेल्या एका तरुणाला आपल्या जिवाला मुकावे लागले. तर दुसऱ्या तरुणावर हत्येचा ठपका लागल्याने त्याचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले.
विकृत कृत्य घडलं स्वार्थी प्रियकराच्या हातून, ‘निकाह’ला नकार देणाऱ्या…