Last updated on January 10th, 2022 at 12:56 pm
नाशिक : ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ची बिरुदावली मिरवणाऱ्या नाशिक शहरातील ध्वनी व जलप्रदूषणात मोठी वाढ झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून समोर आला आहे. औद्योगिक क्षेत्राच्या तुलनेत नागरी भागातील ध्वनीप्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे तर गोदावरीसह उपनद्यांमधील बीओडीचे प्रमाण १० पर्यंत अपेक्षित असताना हेच प्रमाण अनेक भागात २० ते ३० टक्क्यांपुढे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आल्याने महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रांची अकार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
मनपाचा पर्यावरण अहवाल: गोदावरीसह उपनद्यांमधील बीओडीचे प्रमाण धोकादायक
धक्कादायक बाब म्हणजे शहराच्या पर्यावरणावर दुरगामी परिणाम करू शकणारा हा गोदावरी नदीला धार्मिक महत्त्व आहे. किंबहुना सिंहस्थभूमी असलेल्या नाशिकची ओळखच दक्षिणगंगा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोदावरीमुळे आहे. मात्र या गोदावरीसह दारणा, नंदिनी व कपिला या चारही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. या नद्यांवरील पाण्याचे प्रवाहाच्यावर, मध्य प्रवाह आणि खालचा प्रवाह या तिन्ही ठिकाणचे नमुने तपासल्यानंतर तेथे पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन अर्थातच बीओडीचे प्रमाण १० पेक्षा कमी असणे अपेक्षित असताना ते काही भागात अतिरिक्त आढळले. गोदावरीबाबत विचार केला तर तपोवनात बीओडी तब्बल २४ इतका आढळल्यामुळे प्रदुषणाची पातळी अधिक असल्याचे स्पष्ट होते. सीओडी व टिएसएस मात्र मर्यादित आहे. नंदिनी नदीत बीओडी आयटीआय पुलाजवळ ३१, सीटी सेंटर मॉलजवळ ४० तर समाजकल्याण विभागाजवळ २१ इतके आहे. वाघाडीबाबत विचार केला तर, म्हसरूळ भागात ४८ तर गणेशवाडीजवळ ११ इतका आहे. वालदेवीत विहीतगावजवळ १८ इतका आढळला आहे.
एमआयडीसीपेक्षा शहरात दणदणाट अधिक
एमआयडीसीपेक्षा शहरातील नागरी भागात ध्वनीप्रदूषणाची पातळी अधिक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पंचवटी कारंजा, द्वारका, मेनरोड, त्र्यंबकरोड आयटीआय सिग्नल, मुंबई नाका, जुने सी. बी. एस या ठिकाणी आवाजाचा दणदणाट दिवसा व रात्री दोन्हीवेळेस आढळून आला. दिवसा ५५ तर रात्री ४५ डेसीबलपर्यंत आवाज मयार्दा आहे. मात्र ही मयार्दा ओलांडून दिवसा साधारण ७० डेसीबल तर रात्री ६५ डेसीबलपर्यंत काही ठिकाणी आवाज आहे.
नाशिकची हवा शुध्द !
नाशिकमध्ये ध्वनी व जलप्रदूषणात वाढ झाली असताना शहरातील हवा मात्र शुध्द असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. महापालिकेने त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नल, सातपुर, अंबड एमआयडीसी, मेनरोड, मुंबई नाका, जुने सी.बी. एस, पंचवटी कारंजा व द्वारका येथील हवेचे नमुने घेत धुलीकण, अतिसुक्ष्म धुलीकण, सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रोजनडाट ऑक्साईड आणि कार्बन मोनाक्साईड यांची तपासणी केल्यानंतर सर्वच विहीत मयादेंखाली असल्याचे आढळले.
आठ हजार हेक्टरवरील तूर, हरभऱ्याला अवकाळीचा तडाखा