Last Updated on February 1, 2023 by Piyush
Nashik : देशातील रेल्वेचे जाळे ‘वंदे भारत एक्स्प्रेसने ‘ जोडण्याच्या केंद्राच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून सध्या राज्यात मुंबई आणि नागपूरमधून दोन मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. त्यात आता आणखी दोन एक्स्प्रेसची भर पडणार असून त्यातील एक एक्स्प्रेस नाशिकमार्गे-शिर्डी अशी धावणार असल्याने नाशिककरांना वंदे भारतमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. (CST-Shirdi ‘Vande Bharat Express’ train will run via Nashik)
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा दाखविणार असल्याने येत्या काही दिवसांतच नाशिककरांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात नाशिकसाठी वंदे भारत एक्स्प्रेस मिळावी, अशी तमाम नाशिककरांनी अपेक्षा व्यक्त केली होती.
गेल्या अनेक वर्षांत नाशिकला नवीन गाडी सुरू झालेली नसल्याने आणि असलेल्या गाड्या लांबविण्यात आल्यामुळे नाशिककरांची नाराजी आहेच. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे नाशिककरांना दिलासा मिळणार आहे.
आठवड्यातून किती दिवस?
वंदेभारत गाडी आठवड्यात किती दिवस धावेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आठवड्यातील सहा दिवस गुरुवार वगळता गाडी धावेल असे सांगितले जाते, तर आठवड्यातून केवळ एकच दिवस वंदे भारत धावणार असल्याचे काहीजण सांगत आहेत. प्रत्यक्षात गाडी सुरु झाल्यानंतरच याबाबतची स्पष्टता होणार आहे. मात्र, गाडी सुरु होणार हे निश्चित झाले आहे.
नाशिकरोडसह इगतपूरी, कल्याणला थांबणार
सीएसटी ते साईनगर शिर्डी आणि सोलापूर-सीएसटी अशा दोन एक्स्प्रेस धावणार असून शिर्डीकडे जाणारी गाडी नाशिकमार्गे धावणार आहे. त्यामुळे नाशिककरांना शिर्डी आणि परतीच्या प्रवासात मुंबईपर्यंतचा प्रवास साध्य होणार आहे. दादर, ठाणे, कल्याण, इगतपूर, नाशिकररोड आणि मनमाड असे या गाडीला थांबे देण्यात आले आहेत.
सीएसएसटी-साईनगर ही गाडी पाच तास ५५ मिनिटांनी शिर्डीत धावणार आहे. सीएसटी येथून सायंकाळी ६ वाजता ही गाडी निघून रात्री १२ वाजून १० मिनिटांनी शिर्डीत पोहोचणार आहे.
१६ एसी डबे, १,१२८ क्षमता
अद्ययावत माहिती प्रणालीद्वारे सुसज्ज अशी ही गाडी असून या गाडीला १६ डबे आहेत. हे सर्व डबे वातानुकूलित असून गाडी तासी १२० किलोमीटरने धावणार आहे.
या गाडीतील प्रवासी संख्या १,१२८ इतकी असल्याने मुंबई आणि नाशिककरांना शिर्डीला जाण्यासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण गाडी ठरणार आहे. मुंबईहून सायंकाळी सुटणारी ही गाडी नाशिकला कधी पोहोचेल याबाबतचे वेळापत्रक समोर आलेले नाही.
वाचा : पोलिस भरतीत लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर