Last updated on January 10th, 2022 at 02:41 pm
नागपूर: चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घालून कुलूपबंद घरांना लक्ष्य केले. आता त्यांनी मोर्चा लग्नसमारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स, गळ्यातील दागिन्यांवर हात साफ करीत आहेत. चोरट्यांच्या टोळीत विधिसंघर्षग्रस्त बालक अग्रेसर असल्याचे दिसते. चोरट्यांनी बुधवारी यशोधरानगरातील लांबा सेलिब्रेशन लॉनमध्ये आयोजित लग्नसमारंभातून सोन्याचे दागिने, मोबाइल व नगदी दोन लाख २० हजार रुपये, असा एकूण तीन लाख ६० हजार रुपयांची हॅण्डबॅग चोरून नेली.
मंजूषा चंद्रकुमार भगत (५२, रा. न्यू सुभेदार ले-आउट, विनायक अपार्टमेंट, नागपूर) यांच्या मुलीचा विवाहसोहळा ८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता यशोधरानगर हद्दीतील लांबा सेलिब्रेशन लॉन येथे आयोजित करण्यात आला. यावेळी मंजूषा स्टेजसमोर असलेल्या सोफ्यावर बसल्या होत्या. सोन्याचे दागिने, मोबाइल व रोख दोन लाख २० हजार रुपये, असा एकूण तीन लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली हॅण्डबॅग बाजूच्या सोफ्यावर ठेवली. त्या कार्यक्रमात नातेवाइकांसोबत भेट घेत असताना १४ वर्षीय अनोळखी विधिसंघर्ष बालक व त्याच्यासोबत असलेल्या तीन अनोळखी आरोपींनी हॅण्डबॅग चोरून नेली. फिर्यादीच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला.
साक्षगंध कार्यक्रमातून एक लाख ६३ हजारांची बॅग लंपास
नागपूर : प्रतापनगर पोलीसठाण्याच्या हद्दीत गुरुवारी एका साक्षगंध कार्यक्रमातून दीड लाख रुपये रोख व मोबाइल, असा एकूण एक लाख ६३ हजारांचा मुद्देमाल असलेली बॅग १५ वर्षांच्या विधिसंघर्षग्रस्त बालकाने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी सुमित अनिल तिवारी (वय २९, रा. चंदननगर, मेडिकल चौक, नागपूर) यांचे प्रतापनगर हद्दीतील गोल्डन लीफ हॉल, त्रिमूर्तीनगर, नागपूर येथे साक्षगंध होते. रात्री १० ते १०.३० वाजताच्या सुमारास साक्षगंधाचा कार्यक्रम सुरू असताना फिर्यादीची आई आशा तिवारी (६१) यांनी त्यांच्याजवळील क्रीम रंगाची बॅग बाजूला ठेवली होती.
त्या बॅगेत रोख दीडें लाख रुपये व मोबाइल, असा एकूण एक लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. दरम्यान १५ वर्षे वयोगटातील एका अनोळखी विधिसंघर्ष बालकाने बॅग चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
छोट्याश्या खिडकीतून चोर अशा प्रकारे जाताना पाहून तुम्हीही थक्क व्हाल;…