जळगाव : तुरीची आवक यंदा घटल्याने तूर डाळीचे दर वाढतच जात आहे. गेल्या १५ दिवसांपासून बाजारात १३८ ते १४५ रुपये किलो दरावर तूर डाळीचे दर स्थिर आहेत. त्यातच आता बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक पूर्णपणे बंद झाल्यामुळे आगामी काही महिने तरी तूर डाळीचे भाव कमी होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे भातावरचे वरण सर्वसामान्यांना जरा महागच पडणार असल्याची स्थिती आहे.
यंदा तुरीचे लागवड क्षेत्र कमी होते. त्यात अवकाळी, अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाली. त्यामुळे तूर डाळीच्या आवकवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. दुसरीकडे तूर डाळीची मागणी ही वर्षभर कायम असते. आवक कमी व मागणी जास्त असल्याने तूर डाळीचे भाव वाढतच जात असल्याची स्थिती आहे.
सद्य:स्थितीत नवीन तूर बाजारात नाही. आता खरीप हंगामात तुरीची लागवड करण्यात आली आहे. नवीन उत्पादन आता नोव्हेंबरपासूनच होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत तरी तूर डाळीचे दर कमी होण्याची शक्यता नसल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून
देण्यात आली आहे.
गेल्या सहा महिन्यात प्रचंड वाढले भाव
डाळींचे भाव पाहता गेल्या सहा महिन्यात तूर डाळीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. फेब्रुवारीपर्यंत तूर डाळीचे दर १०० ते १०५ रुपये प्रति किलो होते. मात्र, त्यात प्रत्येक महिन्यात वाढ होत असून, आता हेच दर १३८ ते १४५ रुपयांपर्यंत गेले आहेत. तसेच आगामी महिनाभरात हेच दर अजून वाढण्याची शक्यता आहे.
म्यानमारमधूनही आवक नाही
देशात कडधान्याच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे. भारत म्यानमारकडून तूर डाळीची आयात करतो. मात्र, सद्य:स्थितीत म्यानमार व इतर देशातून येणारा कच्चा मालही कमी झाला तर आहे. शिवाय देशात सध्या डाळींना चांगली मागणी असल्याने भाववाढ होत आहे.
इतर डाळींचेही दर वाढलेलेच
तूर डाळीचे दर तर वाढलेलेच आहेत. मात्र, उडीद, मूग व हरभरा डाळीचेही दर वाढलेले उडीद डाळ १०८ ते ११५, मूग डाळ ९८ ते १०५ रुपये किलो दराने बाजारात मिळत आहे. तर हरभरा डाळीचेही भाव ६४ ते ६८ रुपये किलो आहेत. दरम्यान, यंदा मान्सून उशिराने दाखल झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्येदेखील उडीद व मुगाची लागवड कमी झाली आहे. सद्यःस्थितीत नवीन माल बाजारात नाही. त्यामुळे या डाळींचेही दर वाढण्याची शक्यता आहे.
नवीन तूर आता दिवाळीनंतरच बाजारात दाखल होईल. सद्य:स्थितीत तुरीचे उत्पादन कमी झाले आहे. म्यानमारमधून आयात थांबली आहे. बाजारात नवीन आवक नसून, मागणी मात्र कायम आहे. त्यामुळे तूर डाळीचे दर वाढलेले आहेत. सद्य:स्थितीत तूर डाळच्या दरात कोणतीही घट होण्याची शक्यता कमीच आहे. – प्रवीण पगारिया, धान्य व्यापारी.