Last Updated on January 5, 2023 by Vaibhav
अंबरनाथ : प्राचीन शिवमंदिराच्या माध्यमातून शहराची ओळख राष्ट्रीय स्तरावर प्रभावी करण्यात येणार आहे. या हेतूने अंबरनाथ टेम्पल सिटी करण्याचा निश्चय नगरपालिका प्रशासनाने आहे. त्यादृष्ट शिवमंदिराची संकल्पना राबवणे, प्राचीन वास्तुशैलीला साजेसे चौकांचे आणि रस्त्यांचे सुशोभिकरण करण्याच्या विविधांगी कामांचा योजनेत अंतर्भाव होणार आहे.
अंबरनाथच्या पूर्वेत ९६० वर्षांपूर्वीचे शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर आहे. मंदिराच्या माध्यमातून मंदिरालगतच्या परिसराचा विकास करण्यात येत आहे. १४० कोटींचा शिवमंदिर परिसर विकास आराखडा मंजूर झाला आहे. पुरातत्त्व विभागाच्या अंतिम मंजुरीनंतर त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. मंदिर परिसराचे सुशोभिकरण होत असताना विकासकामांच्या अंतर्गत शहरातील रस्ते आणि मुख्य चौकांचे सुशोभिकरण शिवमंदिराच्या अनुषंगाने करण्याचा प्रयत्न पालिका करत आहे.
या प्रकल्पाच्या अनुषंगाने पूर्ण अंबरनाथ शहर सुशोभित करण्याचा आणि शहराची राष्ट्रीय स्तरावर ओळख होण्यासाठी टेम्पल सिटी करण्याचे प्रशासनाने ठरवले आहे. या कामासाठी तज्ज्ञ प्रकल्प व्यवस्थापन आणि सल्लागारांची नगरपालिका पातळीवर नेमणूक केली जाणार आहे. योजनेमधून शिवमंदिराची संकल्पना राबवणे, शिवमंदिराच्या प्राचीन वास्तुशैलीला साजेसे चौकांचे आणि रस्त्यांचे सुशोभिकरण करण्याच्या विविधांगी कामांचा अंतर्भाव आहे. या कामासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली आहे.
प्राचीन शिवमंदिराला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी, यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून शिवमंदिर फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. तीनदिवसीय चालणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये जागतिक कीर्तीच्या दिग्गज कलाकारांना पाचारण करण्यात आले होते. त्यामुळे प्राचीन शिवमंदिराला नावलौकिक मिळाला. आता शहराचे सुशोभिकरणच मंदिराच्या धर्तीवर केले जाणार असल्याने शहराला देखणे स्वरूप येणार आहे. अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर हे शिलाहारकालीन स्थापत्यशैली आणि त्याकाळी प्रचलित असलेल्या शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
अंबरनाथ शहर प्राचीन शिवमंदिरामुळे प्रसिद्ध आहे. मंदिर परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे अंबरनाथ शहराची जागतिक पातळीवर मंदिराचे शहर म्हणून ओळख स्थापित होण्यास मदत होणार आहे.– डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार