जुन्या घराच्या खरेदीनंतर वीजजोडणी आपोआप नावावर होणार


Last Updated on December 2, 2022 by Vaibhav

महावितरणच्या नव्या उपक्रमामुळे नव्या मालकांना दिलासा

मुंबई: आता एखादे जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर त्याच्या विजेची जोडणी जुन्या मालकाकडून नव्या आहे. मालकाच्या नावावर आपोआप होणार आहे. महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन व्यवस्था कार्यान्वित केली असून उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’च्या सूचनेनुसार हा उपक्रम राबवण्यात येत आहे. महावितरण अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी हा उपक्रम राबवल्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले

एखाद्याने जुने घर किंवा दुकान खरेदी केले आणि त्यानुसार मुद्रांक शुल्क भरून संबंधित विभागाकडे नोंदणी केल्यानंतर त्या घराचे किंवा दुकानाचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून आपल्या नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत होता. या बदलासाठी महावितरणकडे अर्ज व सोबत कागदपत्रे दाखल करून प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केली जात असे. महावितरणने यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. त्यानुसार ऑनलाइन अर्ज भरून कागदपत्रे अपलोड करता येतात. मात्र प्रकियेत वेळ जात असल्याने मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टिम जोडली आहे. या नवीन कार्यप्रणालीची चाचणी नुकतीच यशस्वी झाली आहे.
अशी असेल नामांतराची प्रक्रिया
नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाली की, महावितरणला संदेश पाठवण्यात येईल. त्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकालाही संदेश पाठवण्यात येईल व आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्यास कळवले जाते. हे शुल्क ग्राहक ऑनलाइन भरू शकतो. प्रक्रिया शुल्क भरले की वीज जोडणी नावावर होते आणि पुढील महिन्याचे विजेचे बिल नव्या मालकाच्या नावाने पाठवले जाते. एकापेक्षा अधिक
व्यक्तींच्या नावे घराची खरेदी झाली तर त्यांच्याशी संपर्क साधून कोणाच्या नावे वीज जोडणी हस्तांतरित करायची आहे, याची निवड करण्यास सांगितले जाते. वीज जोडणी ही एक व्यक्ती किंवा संस्थेच्या नावे असू शकते. नव्या प्रक्रियेत वीज कनेक्शन नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करणे, कागदपत्रे दाखल करणे, पडताळणी करणे व पाठपुरावा करण्यासाठी नव्या मालकाला तसदी घ्यावी लागणार नाही.हेही वाचा: अनुसूचित जमाती प्रवर्गातील प्रलंबित विशेष पदभरतीसाठी महिनाभरात जाहिरात