आफताबची नार्को चाचणीत हत्येची कबुली, श्रद्धाचा मोबाइल, कपड्याबाबत सुगावा लागण्याची शक्यता


Last Updated on December 2, 2022 by Vaibhav

नवी दिल्ली : देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी आरोपी आफताब अमीन पूनावाला याची गुरुवारी यशस्वी नार्को चाचणी घेण्यात आली. या तपासात आफताबने रागाच्या भरात आपण श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली. तसेच त्याने श्रद्धाचे मोबाईल व कपडे कुठे फेकून दिले आहेत, याचीदेखील माहिती दिल्याचे समजते. नार्को चाचणीतून अपेक्षित ठोस पुरावे पोलिसांना सापडले नाही, तर आफताबची ब्रेन मॅपिंग चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या रोहिणीस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आफताब पूनावालाची नार्को चाचणी पार पडली. सकाळी ८ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास आफताबला रुग्णालयात आणण्यात आले होते. याठिकाणी सर्वप्रथम त्याच्या सामान्य वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. यानंतर सकाळी १० वाजता सुरू झालेली नार्को चाचणी दोन तासांनी संपुष्टात आली.

चाचणी प्रक्रिया यशस्वी राहिल्याची माहिती विशेष पोलीस आयुक्त (कायदा व व्यवस्था) सागर प्रीत हुड्डा यांनी दिली. आफताबला शुक्रवारी येथील फरिन्सिक विज्ञान प्रयोगशाळा अर्थात एफएसएलमध्ये घेऊन जाण्याची शक्यता आहे. याठिकाणी पॉलिग्राफी व नार्को चाचणीदरम्यान आफताबने दिलेल्या उत्तरांचे विश्लेषण केले जाईल. पॉलिग्राफ चाचणीप्रमाणे नार्को चाचणीत देखील आफताबने रागाच्या भरात हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्याने श्रद्धाचे मोबाईल व कपडे कुठे टाकले, याबाबतदेखील माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय आफताबने हत्येशी संबंधित अनेक बाबींचा उलगडा केल्याने पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागण्याची शक्यता आहे. नाकों चाचणीच्या माध्यमातून झालेल्या चौकशीनंतर देखील पोलिसांना ठोस काही मिळाले नाही, तर आफताबची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्याची परवानगी मागितली जाऊ शकते.

नाकोंचाचणीत जरी आफताबने हत्येशी संबंधित खुलासे केले असले तरी ते प्राथमिक पुरावे म्हणून न्यायालयात मांडता येणार नाहीत. फक्त काही अपवादात्मक परिस्थितीत न्यायालय ते स्वीकारू शकते. पण पॉलिग्राफी व नार्को चाचणीतून हाती आलेल्या माहितीद्वारे पोलीस आणखी ठोस पुरावे शोधून ते न्यायालयासमक्ष सादर करू शकतात. २८ वर्षीय आफ पूनावालावर ‘लिव्ह-इन पार्टनर’ श्रद्धा वालकर हिची निर्घृणपणे हत्या करत तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते विविध भागांत फेकून दिल्याचा आरोप आहे. हत्येप्रकरणी आफताबला १२ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती.हेही वाचा: आईने मुलासह नवऱ्याची केली हत्या, फ्रीजमध्ये ठेवले मृतदेहाचे 22 तुकडे, जाणून घ्या त्रिलोकपुरी हत्याकांडाची संपूर्ण कहाणी