आफताबने मागे घेतली जामीन याचिका


Last Updated on December 23, 2022 by Vaibhav

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाने गुरुवारी आपली जामीन याचिका मागे घेतली. आफताब तुरुंगातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश वृंदा कुमारी यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी हजर झाला. जामिनासाठीची दाखल केलेली याचिका मागे घेऊ इच्छित असल्याचे यावेळी त्याने न्यायालयाला सांगितले. यानंतर न्यायाधीशांनी आफताब त्याची जामीन याचिका मागे घेत असल्याने ती फेटाळण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

आफताबचे वकील एम. एस. खान यांनी त्या दोघांमध्ये संवादहीनता असल्याने याचिका दाखल केल्याचे न्यायालयाला सांगितले. गत आठवड्यात आफताबची जामीन याचिका सुनावणीसाठी आली असता त्याने याबाबत आपल्याला कल्पनाच नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते. मी केवळ वकीलपत्रावर स्वाक्षरी केली. मात्र माझ्या वकिलाने जामिनासाठी याचिका दाखल केल्याची मला काहीच माहिती नाही, असे आफताब सुनावणीवेळी म्हणाला होता. यावर न्यायाधीशांनी त्याला जामीन याचिका परत घ्यायची आहे का, असे विचारले असता त्याने होकारार्थी उत्तर दिले. माझ्या वकिलाने माझ्याशी बोलून पुढील निर्णय घ्यावा, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे सध्या जामीन याचिका मागे घेत आहे, असे आफताबने सांगितले होते. यानंतर न्यायाधीशांनी आरोपी आणि वकिलाची चर्चा होईपर्यंत ही जामीन याचिका प्रलंबित ठेवण्यात येत असल्याचे स्पष्ट केले होते. श्रद्धा ही आफताबसोबत लिव्ह इन नात्यात होती. आफताबने मे महिन्यात श्रद्धाची गळा आवळून हत्या केली होती.

हेही वाचा: बनाव रचला; पण मोबाइलने फोडले ‘ती’च्या हत्येचे बिंग