आर्वी/वर्धा : आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी शुकवारी आर्वी गाठून अवघ्या २० मिनिटांत अवैध गर्भपाताचा अड्डा राहिलेल्या आर्वीच्या कदम हॉस्पिटलची पाहणी केली. त्यापूर्वी त्यांनी सुमारे साडेतीन तास आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात घालवून येथील प्रसूती कक्ष, स्टोअर रुम आदींची पाहणी करून आवश्यक मार्गदर्शक सूचना जिल्हा शल्य चिकित्सक व आर्वी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना दिल्यात. याप्रसंगी नागपूर विभागाचे उपसंचालक संजय जयस्वाल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आर्वी शहरात सकाळी ८.३० वाजता दाखल झालेल्या डॉ. अर्चना पाटील यांनी ९ वाजता आर्वीचे उपजिल्हा रुग्णालय गाठले. त्या येथे ३ तास ४५ मिनिटं ठाणच मांडून होत्या. त्यांनी सुरुवातीला आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती कक्ष व औषध भांडार आणि स्टोअर रुमची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी राज्यभरात खळबळ माजविणाऱ्या आर्वीच्या अवैध गर्भपाताचा अड्डा राहिलेले कदम हॉस्पिटल दुपारी १२.५० वाजता गाठले. त्यांनी सुरुवातीला कदम हॉस्पिटलचा आतील भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी कदम हॉस्पिटलच्या मागील भागाची पाहणी केली. विशेष म्हणजे कदम हॉस्पिटलच्या मागील भागात आर्वी पोलिसांच्या वतीने खोदकाम केल्यावर तेथे १२ मानवी कवट्या व ५४ हाड सापडली होती. दुपारी १२.५० वाजता कदम हॉस्पिटलमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. अर्चना पाटील यांनी दुपारी १.१० वाजता कदम हॉस्पिटलच्या आवारातून बाहेर पाय काढला. त्यानंतर त्या आर्वी येथून पुढील नियोजित ठिकाणी रवाना झाल्यात.
आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरणाचा सहा सदस्यीय अभ्यास गट समितीकडून सखोल अभ्यास केला जात आहे. येत्या काही दिवसांत ही सहा सदस्यीय अभ्यास गट समिती आपला अहवाल सादर करणार असून, त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. नक्कीच दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न होईल. – डॉ. संजय जयस्वाल, उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर
कोरिओग्राफर रेमो डिसोझा यांचा मेहुणा जेसन वॅटकिन्स केली आत्महत्या