ऊसतोडणीसाठी पैशांची मागणी झाल्यास कारवाई


Last Updated on November 24, 2022 by Vaibhav

साखर आयुक्तांचा इशारा : कारखाना व्यवस्थापनालाही सूचना

नांदेड ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांकडून रोख पैशांची अथवा इतर सेवा आणि वस्तूंची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून वारंवार केल्या जात आहेत. या गळीत हंगामात असा प्रकार झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना साखर आयुक्तांनी दिल्या आहेत.

सध्या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडील ऊसतोडणीचे कामही केले जात आहे. ऊसतोडणी मजूर, मुकदम व वाहतूक कंत्राटदारांकडून ऊसतोडणी करताना पीक चांगले नाही, क्षेत्र अडचणीचे आहे, अशी कारणे देऊन शेतकऱ्यांकडून रोख पैशांची व अन्य सेवांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. अशा तक्रारी प्राप्त होताच सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व खासगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सात दिवसांत तक्रारींचे निराकारण करावे. तक्रारीत तथ्य आढळून आल्यास ही रक्कम मजूर, मुकदम, वाहतूक कंत्राटदार यांच्या बिलातून कपात करून संबंधित शेतकऱ्यांना अदा करावी, अशा निर्देश साखर आयुक्त शेखर गायकवाड, प्रादेशिक उपसंचालक (साखर) विश्वास देशमुख यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे कारखाना प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्रादेशिक उपसंचालक कार्यालयास सादर करण्याच्या सूचना प्रादेशिक उपसंचालकांनी दिल्या आहेत.

अधिकाऱ्याची नियुक्ती करा

ऊसतोडणीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकारण करण्यासाठी प्रत्येक साखर कारस्वान्यांनी शेती विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती करावी.

तक्रार निवारण अधिकाऱ्यांचे नाव, संपर्क क्रमांक याची माहिती कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊसतोडणी होत असलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तक्रार कुठे करायची?

ऊसतोडणी करताना अतिरिक्त पैशांची अथवा सेवेची मागणी होत असेल तर शेतकऱ्यांनी साखर कारखाना प्रशासनाकडे लेखी स्वरुपात लगेच तक्रार करावी व त्याची पोहोच घ्यावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सात दिवसांत तक्रारीचे निवारण करावे लागणार आहे. हेही वाचा: दुबईतील जानी विश्वनाथन यांची राहीबाई यांच्या बीज बँकेला भेट