Last updated on January 10th, 2022 at 02:23 pm
सांगली: येथील कऱ्हाड शेडगेवाडी राज्य मार्गावरील वळणावर लग्न समारंभानंतर परत निघालेली ट्रॅव्हल्स पलटी होऊन झालेल्या अपघातात ९ जण गंभीर जखमी झाले. याबाबत चालक राजूसिंग राजपूत याच्या विरोधात कोकरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली. याबाबत गाडीतील आचारी ताराचंद रामनिवास साहू (वय ३५, रा. पिसागन, जि. अजमेर राज्यस्थान) यांनी कोकरूड पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत कोकरुड पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, राहू राजस्थान येथील आचारी ताराचंद आपल्या सहकाऱ्यासमवेत ओम शांती ट्रॅव्हल्स (आर.जे. ०९ पी.ए.४१४७) गोवा येथील लग्न समारंभाचे काम संपल्यानंतर रत्नागिरी, आंबाघाट, मलकापूर, कोकरूड, शेडगेवाडीमार्गे कराडवरून राजस्थानला निघाले होते. दरम्यान, कराड शेडगेवाडी राज्य मार्गावर मेणी येथे गाडी आली असता चालकाचा ताबा सुटल्याने पुलाच्या लोखंडी संरक्षण ग्रीलला धडकून पुलावरून सुमारे २० फूट खाली कोसळून पलटी झाली.
यामध्ये ट्रॅव्हल्समधील आचारी ताराचंद रामनिवास साहू यांच्यासह त्याचे सहकारी चंद्र प्रकाश माळी, पिंटू गुज्जर, अशोक प्रजापती, जसराज चाट, गोपाल, कान्हा जाट, चालक राजुसिंग राजपूत व क्लिनर राजेंद्र सिंग असे नऊजण जखमी झाले आहेत. त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ट्रॅव्हल्सचे सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले असून अपघात एवढा मोठा झाला असतानाही कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिवाजी जाधव करत आहेत.