शेतकऱ्याचा नादच खुळा! आलिशान मोटारीतून भाजीविक्री; लिलावात दर न मिळाल्याने थेट बाजारात लावली मोटार


Last Updated on December 5, 2022 by Piyush

सांगली: आटपाडीमध्ये शनिवारच्या आठवडा बाजारात एका तरुण शेतकऱ्याने आपल्या आलिशान मोटारीतून मेथीच्या भाजीची विक्री करत शेतकरी नावाच्या ‘ब्रँड’ची झलक दाखवली. चक्क आलिशान गाडीतून एक तरुण शेतकरी ओरडून मेथीची भाजी विक्री करत असल्याचे पाहून बाजारकरूंनीही भाजी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

शेती परवडत नाही, म्हणून अनेक शेतकरी आपल्या नशिबाला दोष देताना दिसतात. मात्र, आपण पिकवलेला माल आपण स्वतः विकला तर त्याला हमखास दर मिळतोच, हे दाखवून देण्यात आटपाडी तालुक्यातील झरे गावचे शेतकरी वामन पांडुरंग गोरड यांना यश आले.

शेती करत असताना शेतकऱ्याला अनेक संकटाचा सामना करावा लागतो. पीक घेत असताना असणारे हवामान, मजूर, लहरी निसर्ग याचबरोबर हवामान बदल, पिकावर रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. यातूनही पीक व्यवस्थित आले तर सर्वात मोठा धक्का त्याला कष्ट करून पिकवलेला माल बाजारपेठेत विक्रीस नेल्यानंतर मिळालेला भाव पाहून बसतो. उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही.

यावर नामी शक्कल लढवत झरे येथील गोरड यांनी आपल्या आलिशान गाडीतूनच भाजी विकण्याचा निर्णय घेतला. मेथीची भाजी लिलावामध्ये नेण्यासाठी लागणारे वाहन भाडे, तसेच लिलावात मिळणारा दर पाहून ते त्रस्त झाले होते. याला पर्याय शोधत त्यांनी थेट स्वमालकीची आलिशान मोटार भाजीच्या पेंड्या भरून शनिवारी आटपाडीच्या आठवडा बाजारात आणली.

आटपाडी नगरपंचायतीसमोर मोटार उभी करून मोठ्याने ओरडून भाजी विक्री केली. यातून त्यांना प्रत्येक पेंडीमागे लिलावातील दरापेक्षा चार पट अधिक दर मिळाला. दरम्यान, आटपाडीच्या बाजारपेठेत प्रथमच अशा प्रकारे आलिशान मोटारीतून भाजी विक्री होत असल्याचे पाहून बाजारकरूंमध्येही कुतूहल होते.

वाचा : या पिकांसाठी 450 रुपयांचा हप्ता भरा अन् 30 हजारांचा विमा मिळवा!