देशात बनावट मद्यामुळे सहा वर्षांत ७ हजार बळी !


Last Updated on December 19, 2022 by Vaibhav

नवी दिल्ली : भारत देशात मागील सहा वर्षांत बनावट दारूने तब्बल ७ हजार नागरिकांचा बळी घेतल्याची धक्कादायक बाब राष्ट्रीय गुन्हेगारी तपशील विभागाने (एनसीआरबी) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक व पंजाब राज्यांत बनावट दारूमुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याचे एनसीआरबीच्या आकडेवारीत म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गत दोन ते तीन दिवसांत दारूबंदी असलेल्या बिहार राज्यात बनावट दारू प्यायल्याने ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

देशात बनावट दारू प्यायल्याने सन २०१६ मध्ये १०५४ लोकांचा मृत्यू झाला. सन २०१७ मध्ये १५१० जणांचा २०१८ मध्ये १३६५, २०१९ मध्ये १२९६, तर २०२० मध्ये ९४७ लोकांचा बळी गेला. गतवर्षी देशभरात बनावट दारूच्या ७०८ घटनांमध्ये ७८२ लोकांचा मृत्यू झाल्याचे एनसीआरबीच्या आकडेवारीत म्हटले आहे. २०२१ मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक १३७, पंजाब १२७, तर मध्य प्रदेशात १०८ लोकांचा बनावट दारूने मृत्यू झाला. २०१६ ते २०२१ या सहा वर्षांच्या काळात देशभरात बनावट दारूमुळे ६९५४ लोकांचा मृत्यू झाल्याचे या अहवालात नमूद केले आहे.

यामध्ये मध्य प्रदेशात सर्वाधिक १३२२ बळींचा समावेश आहे. त्याखालोखाल कर्नाटकातील १०१३ जणांचा, तर पंजाब राज्यात बनावट दारूमुळे ८५२ लोकांचा बळी गेला. बनावट मद्यामुळे झालेल्या मृत्यूबद्दल बसपाचे खासदार कुंवर दानिश आली यांनी १९ जुलै, २०२२ रोजी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी २०१६ पासून २०२१ पर्यंतची एनसीबीची आकडेवारी सादर केली होती. २०१६ ते २०२१ या सहा वर्षांत उत्तर प्रदेशात ४२५, राजस्थान ३३०, झारखंड ४८७, हिमाचल प्रदेश २३४, हरियाणा ४८९, गुजरात ५४, छत्तीसगड ३५३, बिहार २३, आंध्र प्रदेश २९३, पश्चिम बंगाल २४, पुदुचेरी १७२, तर दिल्लीत ११६ जणांचा बनावट दारूने बळी गेला आहे.

हेही वाचा: पालघर: अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार