व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सायबर भामट्यांनी लुटले ५७ कोटी


Last Updated on December 19, 2022 by Vaibhav

मुंबई : समाजमाध्यम म्हणून ओळखले जाणारे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, मेसेंजर, इन्स्टाग्रामसारखे संदेशमंच आता अक्षरशः ‘समाजकंटक’ माध्यम बनले असून, त्याची प्रचिती विविध वारंवार येत असते. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक ही फेकन्यूज प्रसाराची माध्यमे बनली आहेतच, पण त्यांद्वारे लोकांची आर्थिक फसवणूक करण्याचेही प्रकार उघडकीस येत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपवरील वीज बिलाचा संदेश हे त्याचे एक उदाहरण असून, आता त्याच्यासारखाच लोकांची लुबाडणूक करणारा एक फसवणूक प्रकार समोर आला आहे. ‘हाय मम’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रकारात लोकांकडून हातोहात पैसे पळवले जात आहेत. सध्या हा ‘हाय मम’ स्कॅम ऑस्ट्रेलियात बोकाळला आहे. ‘ऑस्ट्रेलियन कन्झ्युमर अँड काँपिटिशन कमिशन’ (एसीसीसी) ने दिलेल्या माहितीनुसार या एका वर्षात या स्कॅमद्वारे अनेक ऑस्ट्रेलियन नागरिकांना सुमारे ५७ कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला असून, गेल्या तीन महिन्यांत अशा घटनांमध्ये दसपट वाढ झाली आहे.

अशा घटनेची नोंद भारतात झालेली नसली, तरी इंटरनेटचा स्वभाव आणि वर्तन पाहता त्या भारतात घडणारच नाहीत असे नाही, असे जाणकारांचे मत आहे. यापूर्वी अशाच प्रकारची फसवणूक फेसबुकच्या माध्यमातून केली जात असे. त्याला अनेक भारतीय लोक बळी पडले आहेत…

अशी काळजी घ्या

१. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या कोणत्याही फॉरवर्डवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका.

२. कोणी पैशांची मागणी केली असेल, तर प्रथम त्या व्यक्तीशी संपर्क साधा.

३. कोणालाही ओटीपी देऊ नका. ओटीपी म्हणजे जणू तुमच्या तिजोरीची चावी हे लक्षात ठेवा.

४. बँकेच्या कार्डचा पिन वा सीव्हीही यांसारखा तपशील कोणालाही सांगू नका.

हेही वाचा: सायबर हल्ले : रोज १५०० घटना!