Last Updated on December 27, 2022 by Vaibhav
अजित पवारांचे विधानसभेत आरोप; उपमुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश !
नागपूर : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात होणाऱ्या महोत्सवासाठी कृषी आयुक्तांनी राज्यातील कृषी अधिकाऱ्यांना या महोत्सवासाठी १५ कोटी जमवण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. ही माहिती समोर आणतानाच पवार यांनी आक्रमक होत सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर तातडीने चौकशी करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पवार यांनी विधानसभेत १५ कोटींच्या टार्गेटची माहिती देताना सांगितले की, सिल्लोड महोत्सवासाठी आयोजकांनी वेगवेगळ्या रकमेचे कूपन काढले आहेत. ते कूपन विकण्याचे किंवा खपवण्याचे काम राज्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. १० पेक्षा जास्त तालुके असणाऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना वेगळे आणि १० पेक्षा कमी तालुके असणाऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना वेगळे टार्गेट देण्यात आल्याचे ते म्हणाले. पवार म्हणाले की, कूपनमध्येही वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत.
कृषी दुकानांकडूनही काही बेकायदेशीर रकमेची मागणी होत आहे. हे लोकशाहीला धक्का देणारे कृत्य आहे. हे सगळ्या नियमांची पायमल्ली करत असतात. त्यामुळे आम्ही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत, असे पुढे पवार आक्रमकपणे म्हणाले. त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी करत कामकाज रोखून धरले.
यानंतर फडणवीस यांनी चौकशीची घोषणा केली.
१ ते १० जानेवारीदरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे सिल्लोड कृषी महोत्सवाचे आयोजन सत्तार यांनी केले आहे. त्यांच्या या कार्यक्रमासाठी कृषी(agriculture) आयुक्तांनी राज्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती एका कृषी संचालकाने(Director of Agriculture) दिली आहे. तर या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेले कूपन विकण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर आल्यामुळे अनेक अधिकारी(officer) तणावाखाली आले आहेत.
आपापल्या विभागातून या महोत्सवात स्टॉल लावणाऱ्यांकडून प्रवेशिका आणण्याचे टार्गेट या अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामध्ये २५ हजार, १५ हजार, १० हजार आणि ७ हजार ५०० अशा रकमेच्या प्रवेशिकांचा समावेश आहे, असेही पवार यांनी आरोपात म्हटले आहे.
हेही वाचा: Market News: लाल कांद्याच्या भावात वाढ..! देशांतर्गत मागणी वाढली