मोठी बातमी: संक्रांतीपूर्वी तिळाला ‘गोडी; दर १४ हजारांवर!


Last Updated on December 21, 2022 by Piyush

अकोला : जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कपाशीसह तिळाचे पीकही घेतल्या जाते. गत तीन-चार वर्षांपासून उत्पादनात घट होत असल्याने शेतकऱ्यांनी तिळाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. मात्र आता बाजारात मकर संक्रांतीपूर्वीच तिळाला गोडी आल्याचे चित्र आहे. अकोला बाजार समितीत दि.१७ डिसेंबर रोजी तिळाला प्रति क्विंटल १४ हजार ८०० रुपयांचा भाव मिळाला आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ २५ टक्केच तिळाची पेरणी झाली आहे.

मकर संक्रांतीसाठी तिळाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मकर संक्रांत महिन्याभरावर येऊन ठेपली असून, तिळाचे दर वधारले आहेत. सद्यस्थितीत खाद्यपदार्थांच्या सजावटीबरोबर चवीसाठी तिळाचाही वापर वाढला आहे. त्यातच नैसर्गिक संकटांमुळे तिळाचे उत्पादन घटल्याने तिळाचे दर वाढत चालले आहेत.

अतिपावसाचा परिणाम तिळाच्या दर्जावरही

यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे केवळ उत्पादनात घट झाली नाही, तर हाती आलेल्या तिळाचा दर्जा खालावला आहे. पाऊस जास्त झाल्याने तीळ हलका आणि कमी दर्जाचा, डागी निघाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बाजारात चांगल्या प्रतीच्या तिळालाच अधिकची मागणी आहे. तिळाचे उत्पादन काही मोजक्याच राज्यांमध्ये घेतले जाते. त्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. मात्र यंदा पावसामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन घटले आहे.

उत्पादन कमी, मागणीत वाढ

पावसामुळे राज्यभरात तिळाचे उत्पादन घटले असून, बाजारात मागणी वाढली आहे. त्यामुळे तिळाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत तिळाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. तिळाचे दर वधारले, मात्र त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे. संक्रांतीपूर्वी तिळाला गोडी आली असली, तरी सर्वसामान्यांवर संक्रांत येणार आहे.

जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये तिळाचे पेरणी क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. यंदा कृषी विभागामार्फत ५५३.०४ हेक्टर क्षेत्रावर तिळाची पेरणी करायची होती. सरासरी पेरणी क्षेत्रापेक्षा केवळ २५ टक्केच तिळाची पेरणी झाली आहे. ३५५ एकरांवर तिळाची पेरणी झाली आहे. यंदा पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली.

वाचा : टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत